Mother dies, son is in critical condition : भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमी मुलावर उपचार सुरू आहेत.

रामनगरजवळ बोलेरो पिकअपची दुचाकीला धडक
खामगाव : रुग्णालयात निघालेल्या मायलेकाच्या दुचाकीला ५ मार्च पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भरधाव बोलेरो पिकअपने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमी मुलावर उपचार सुरू आहेत.
सीमा ईश्वर सुरवाडे ( वय ३७) असे मृत आईचे तर शौर्य ईश्वर सुरवाडे (वय १८) असे जखमी मुलाचे नाव आहे. खामगाव तालुक्यातील निळेगाव येथील रहिवासी असलेल्या सीमा व त्यांचा मुलगा शौर्य हे ५ मार्च रोजी पहाटे साडेचार च्या सुमारास रुग्णालयात दुचाकीने निघाले होते.
रामनगर शिवारात बोलेरो पिकअप (क्रमांक MH 56 C 0014) च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात मायलेक गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना आईचा मृत्यू झाला.
सीमा यांचा भाऊ प्रमोद लक्ष्मण इंगळे (वय ५०, रा. पिंपळे गुरव, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खामगाव पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०६ (१) (२), २८१, १२५ (B), ३२४ (४) आणि सहकलम १३४ मोवाकानुसार ९ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे.


