No road even after a 21-year wait. : २१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही रस्ता नाही; नायगाव देशमुखच्या नागरिकांचा संताप, आता जनआंदोलनाचा इशारा

मेहकर, प्रतिनिधी : नायगाव देशमुख ते शेंदूरजन या मार्गाची गेल्या २१ वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली असून, ग्रामस्थांच्या संयमाचा आता अंत झाला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेले पाणी यामुळे विद्यार्थी, महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संयोजक गोपाल महादेव सुरडकर व राम जाधव यांच्या नेतृत्वाखाली संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अनेक वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत असताना प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, हा रस्ता केवळ वाहतुकीचा मार्ग नसून हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा आधार आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात नेण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी हा रस्ता अत्यावश्यक आहे. मात्र आजही नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
यावेळी प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की, तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करून कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता तयार करावा. अन्यथा नायगाव देशमुखचे ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारतील. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.
“२१ वर्षे झाली… आता आश्वासने नकोत, रस्ता हवा!” हीच नायगाव देशमुखच्या प्रत्येक नागरिकाची एकमुखी मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


