‘PK’ passed. : पीके’ पास झाला: डोणगावात जल्लोष, सामान्य बुद्धिमत्तेचा असामान्य विजय

डोणगाव प्रतिनिधी :
राज्यात दहावीच्या निकालाची धामधूम सुरू असताना, डोणगावच्या इंदिरा नगरमध्ये एका अनपेक्षित विजयाने उत्साहाचे वातावरण निर्माण केले. ‘पीके’ नावाने परिचित असलेल्या श्रावणकुमार संतोष मोरे या विद्यार्थ्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या या यशाने केवळ त्याचे कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण गल्ली आनंदात न्हाऊन निघाली.
पीके, जो त्याच्या साधारण बुद्धिमत्तेसाठी ओळखला जातो, त्याने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. त्याच्या अभ्यासातील सामान्य कामगिरीमुळे, तो पास होईल अशी कोणालाही खात्री नव्हती. किंबहुना, तो नापासच होईल अशी अनेकांची धारणा होती. त्यामुळे, त्याचा निकाल पाहण्याची हिंमतही कोणी करत नव्हते. मात्र, दुध डेअरी संचालक जुबेर खान यांनी सहजच पीकेचा निकाल पाहिला आणि त्यांना सुखद धक्का बसला – पीके पास झाला होता!
ही बातमी इंदिरा नगरमध्ये वाऱ्यासारखी पसरली. ‘पीके पास झाला’ हे ऐकताच त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि म्युझिक सिस्टिमवर थिरकणारे तरुण यामुळे संपूर्ण गल्लीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कोणी मिठाई घेऊन आले, तर कोणी पेढे वाटले. एखाद्या नेत्याप्रमाणे पीकेची गल्लीतून मिरवणूक काढण्यात आली, जिथे त्याचे चाहते त्याला खांद्यावर घेऊन नाचत होते.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील क्लिक करा https://mahadesha.com/
या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे पीकेला मिळालेले गुण. त्याला एकूण 44.80% गुण मिळाले आहेत. मराठीमध्ये 48, हिंदीमध्ये 45, इंग्रजीमध्ये 39, गणितामध्ये 37, विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये 41 आणि समाजशास्त्रामध्ये 51 असे गुण त्याला मिळाले आहेत. हे गुण कदाचित खूप जास्त नसतील, पण पीकेच्या अभ्यासातील पार्श्वभूमी पाहता, हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे.

पीके पास झाल्याचे कळताच त्याच्या घरच्यांनीही मोठ्या उत्साहात त्याची आरती ओवाळली. त्याचे फोटो आणि रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जिथे त्याला अनेकांकडून शुभेच्छा मिळत आहेत. ज्याला सर्वजण नाकारत होते, तोच पीके आज विजयाचा मानकरी ठरला आहे. त्याच्या या यशाने हेच सिद्ध केले आहे की, जिद्द आणि प्रयत्नांची साथ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ‘पीके तो पास हो गया’ हे वाक्य आता डोणगावातील प्रत्येक गल्लीत अभिमानाने उच्चारले जात आहे.


