mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

दुबार नावे त्रुटींना आळा : Prevent duplicate name errors

शेअर करा :

Prevent duplicate name errors :  महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहीम

Prevent duplicate name errors


बुलढाणा : भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि दोषमुक्त करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने राज्यभरात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR) मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संविधानाच्या कलम ३२४ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून देशभरात सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला असून राज्यातील तब्बल ९ कोटी ८६ लाख ४४ हजार ४१३ मतदारांच्या नोंदींची सखोल पडताळणी केली जाणार आहे.

गेल्या दोन दशकांपासून निवडणूक आयोगाकडून केवळ विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमा राबविण्यात येत होत्या. मात्र, वाढते स्थलांतर, मतदार यादीतील दुबार नोंदी तसेच सातत्याने होत असलेले बदल लक्षात घेता सखोल पुनरीक्षणाची आवश्यकता निर्माण झाली होती. यापूर्वी आयोगाने १९५२-५६, १९५७, १९६१, १९६५-६६, १९८३-८४, १९८७-८९, १९९२-९५ आणि २००२-०४ या कालावधीत अशा मोहिमा राबविल्या होत्या.

संविधानाच्या कलम ३२६ नुसार मतदार म्हणून नोंदणीसाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आणि तिचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. या मोहिमेद्वारे मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून पात्र नागरिकांची नावे सुनिश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे.

एक लाखांहून अधिक BLO करणार पडताळणी

राज्यातील मतदारांची माहिती पडताळण्यासाठी १ लाख २५३ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि जनसहभाग वाढविण्यासाठी राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) देखील सहकार्य करणार आहेत. सध्या राज्यात विविध राजकीय पक्षांनी १ लाख १३ हजार ५५८ BLA नियुक्त केले आहेत.

मोहिमेचे वेळापत्रक

  • २० ते २९ जून २०२६ : गणना अर्जांची छपाई व BLO प्रशिक्षण
  • ३० जून ते २९ जुलै २०२६ : घरभेटीद्वारे गणना अर्जांचे वितरण व संकलन
  • ५ ऑगस्ट २०२६ : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
  • ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ : दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी
  • ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत : दावे व हरकतींचा निपटारा
  • ७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

घरोघरी जाऊन माहितीची पडताळणी

३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत BLO मतदारांच्या घरी जाऊन पूर्वभरलेले गणना पत्र वितरित करतील. या पत्रात सध्याची मतदार माहिती तसेच २००२-०४ मधील विशेष सखोल पुनरीक्षणातील तपशील उपलब्ध असतील. मतदारांना आवश्यक दुरुस्त्या नोंदविण्यासह नवीन छायाचित्र सादर करण्याची संधीही मिळणार आहे.

मतदारांना स्वतःची किंवा त्यांच्या आई-वडील, आजी-आजोबा यांच्या २००२-०४ कालावधीतील मतदार यादीतील माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मिळवता येणार असून ती माहिती BLO च्या भेटीदरम्यान उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घर बंद असल्यास BLO किमान तीन वेळा भेट देणार असून मतदारांना गणना पत्र ऑनलाइन पद्धतीनेही भरता येणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या नोंदींची पडताळणी होऊ शकणार नाही किंवा त्रुटी आढळतील, त्या मतदारांना नोटिसा देण्यात येणार आहेत.

आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य असले तरी ते भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानले जाणार नाही. त्यामुळे नागरिकत्वाच्या पडताळणीसाठी आवश्यक अन्य कागदपत्रे सादर करावी लागतील.

मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि दोषमुक्त करण्यासाठी तसेच कोणताही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहू नये यासाठी नागरिकांनी या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे. लोकशाही अधिक सक्षम आणि विश्वासार्ह करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top