Son and elderly parents stage hunger strike over agricultural land records : शेतजमिनीची खरेदी करताना समोरील शेतकऱ्याने बँकेचे कर्ज नसलेला सातबारा जोडल्यानंतर दस्त नोंदणी झाली. मात्र त्या जमिनीवर असलेला बँकेचा बोजा कायम राहिला. यामुळे जमीन घेणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाची नोंद होत नसल्याने मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

खरेदी करताना कर्जाचा बोजा असलेली शेतजमीन मारली माथी
बुलढाणा : शेतजमिनीची खरेदी करताना समोरील शेतकऱ्याने बँकेचे कर्ज नसलेला सातबारा जोडल्यानंतर दस्त नोंदणी झाली. मात्र त्या जमिनीवर असलेला बँकेचा बोजा कायम राहिला. यामुळे जमीन घेणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाची नोंद होत नसल्याने मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी कुटुंब त्रस्त झाले आहे. जमिनीची नोंद करण्याच्या मागणीसाठी पोफळ शिवनी येथील वृद्ध आई-वडिलांसह शेतकरी मुलाने स्वातंत्र्य दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मात्र प्रशासनाच्या अनास्थेमुळे पाच दिवसांपासून हे उपोषण दुर्लक्षित आहे.
आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी सिंदखेड राजा तालुक्यातील पोफळ शिवनी येथील सुहास बाळाभाऊ देशमुख या शेतकऱ्याने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे निवेदन सादर केले. तसेच प्रशासनालाही निवेदन देऊन अवगत केले. स्वातंत्र्य दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुहास देशमुख यांच्यासह वडील बाळाभाऊ आणि आई विमल यांनी उपोषण सुरू केले आहे.
गट क्रमांक १७२ मधील क्षेत्र ०.६० आर शेतजमीन आशिष पंजाबराव देशमुख रा. पोपळशिवनी यांच्याकडून खरेदी केली आहे. आशिष देशमुख यांच्या नावाने सत्यजित को. ऑफ क्रेडिट सोसायटी लि. मेहकर शाखा दुसरबीडचा ८ लाख ५० हजार रुपयांचा बोजा या शेतजमिनीवर आहे. खरेदी करून देते वेळी देशमुख यांनी बोजा नसलेला सातबारा जोडला होता, असे निवेदनात नमूद आहे. खरेदी केल्यानंतर शेतीची नोंद करण्यासाठी गेले असता या जमिनीवर बोजा असल्याचे आढळून आले. त्यामुळे बाळाभाऊ देशमुख यांच्या नावाने शेतीची नोंद होऊ शकत नसल्याने अडथळा निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत ही जमीन बाळाभाऊ व मुलगा सुहास देशमुख यांच्या ताब्यात आहे. नोंद करण्यासंदर्भातील प्रकरण अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रविष्ट आहे. तातडीने न्याय निर्णय व्हावा अशी मागणी सुहास देशमुख यांनी केली आहे.

