The diarrhea situation in Nageshwadi is alarming : घाटबोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागेश वाडी मधील डायरिया ग्रस्त रुग्णांची परिस्थिती आणखीनच चिंताजनक झाली आहे. ३० बाधितांना शुक्रवारी मेहकर ग्रामीण रुग्णालय व जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ भरती केल्यानंतर शनिवार, १६ मे रोजी आणखी १४ रुग्णांना जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे.

प्रशासनासह लोकप्रतिनिधी, राजकीय पुढाऱ्यांची भेटीसाठी गर्दी
गावकरी म्हणतात, साहेब खूपच उशीर केला हो! मरायची वाट बघत होते का?
आसिफ शाह
मेहकर : घाटबोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागेश वाडी मधील डायरिया ग्रस्त रुग्णांची परिस्थिती आणखीनच चिंताजनक झाली आहे. ३० बाधितांना शुक्रवारी मेहकर ग्रामीण रुग्णालय व जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ भरती केल्यानंतर शनिवार, १६ मे रोजी आणखी १४ रुग्णांना जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अतिसाराची गंभीर स्थिती पाहता आरोग्य यंत्रणा तसेच अधिकारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची ग्रामस्थांच्या भेटीसाठी आणि पाहणीकरिता गर्दी झाली आहे. पाचशे लोकसंख्येच्या या गावात अडीचशे ते तीनशे जणांची गर्दी झाल्याने जणू काही गावाला यात्रेचे स्वरूप आले आहे.
आदिवासीबहुल नागेशवाडी येथे उद्भवलेल्या डायरियाच्या साथीला आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावात शंभरपेक्षा जास्त रुग्ण असून यापैकी ४५ रुग्णांना मेहकर व जानेफळ येथील शासकीय दवाखान्यात हलविण्यात आले आहे. आतापर्यंत शुद्धीवर नसलेले प्रशासन महादेशामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानंतर जागी झाले. १६ मे रोजी आणखी १४ रुग्णांची प्रकृती खालावली. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच गावात पाहणी करायला यायला सुरुवात झाली. ज्या गावाचा रस्ता कोणाला माहित नव्हता, तेथे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व त्यासोबत बघ्यांची गर्दी जमा होत आहे.
नागेशवाडी या गावात मागील पंधरा ते वीस दिवसापासून दूषित पाण्याने डायरियाची लागण झाली आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असतानासुद्धा याची माहिती आरोग्य विभागाला नव्हती. गावात येणारे खासगी डॉक्टर दररोज ५० ते ६० सलाईन गावात लावत होते. तर १४ मे रोजी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गवई मॅडम यांनी गावात येऊन आरोग्य तपासणी केले असता ६४ रुग्ण डायरियाग्रस्त सापडले. मात्र, असे असतानासुद्धा याची माहिती प्रशासनाला देण्यात आली नाही. १५ मे रोजी ‘महादेशाने’ वृत्त प्रकाशित करताच चार वाजेदरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी, देऊळगाव साकर्षा येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका यांनी गावात येऊन पाहणी केली. जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनीसुद्धा येऊन पाहणी केली व डायरीयाची साथ का पसरली यासाठी पाण्याचे नमुने घेतले. ज्या रुग्णांना जास्त प्रमाणात डायरिया झाला होता अशा ३० रुग्णांना ग्रामीण रुग्णालय मेहकर व प्राथमिक आरोग्य केंद्र जानेफळ येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले तर १६ मेच्या सकाळी पुन्हा १४ रुग्णांना जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी रेफर करण्यात आले. गावात वैद्यकीय अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी गावात असलेल्या रुग्णांवर उपचार केले.
गावात येत असलेले अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांना पाहता गावकरी विचारणा करत आहेत की, साहेब, यायला खूपच उशीर केला हो! गावात परिस्थिती चिंताजनक झाल्यानंतर तुम्ही गावात आले.
मोबाइल रेंजचा अडथळा
गावात मोबाईलला नेटवर्क नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना परिस्थिती पाहण्यासाठी दुरून डोंगर साजरे न करता गावात गाण्याचे काम पडत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना समोर माहिती देण्यासाठी गावातून एक किलोमीटर बाहेर जाऊन कॉल करावा लागत आहे .
आणखी बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा👉 https://mahadesha.com/
आरोग्य यंत्रणेने लक्ष घालण्याची गरज
मेहकर तालुक्यातील कित्येक गावे अशी आहेत की, ज्या ठिकाणी आरोग्य सेवक, सेविका पोहोचत नाहीत. ते मुख्यालयावर फेस रिडींग करून उपस्थिती दर्शवतात. एकीकडे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना ज्या गृहभेटी द्यावा लागतात त्यांचा डाटा कुठे आहे, त्यांनी किती गृह भेटी दिल्या. त्यासोबतच आरोग्य सेवक यांनी गृहभेटी द्यायला हव्या, त्या सुद्धा दिल्या जात नाही दौरा रजिस्टर पूर्ण नाही. या गोष्टीवर लक्ष दिल्या गेले पाहिजे; अन्यथा नागेशवाडीप्रमाणे इतर गावातसुद्धा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या गंभीर परिस्थितीकडे केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.


