The farmer’s faithful companion is gone. : शेतकऱ्याचा सखासोबती गेला

मोताळा : शेतकऱ्यासोबतच राब राब राबणाऱ्या बैलांपैकी एक बैल आगीत होरपळून मृत्युमुखी पडला. तर चार गायी भाजून जखमी झाल्या. तसेच वैरण व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. मोताळा तालुक्यातील आडविहीर शेतशिवारात ९ मे २०२६ च्या रात्री आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
तालुक्यातील आडविहीरचे रहिवासी असलेले भागवत वसंत साबे यांनी आपल्या गट क्रमांक ३२२ मधील शेतात गुरांसाठी गोठा बांधलेला आहे. या गोठ्यामध्ये शेती उपयोगी साहित्य ठेवलेले होते. तसेच गोठ्यात गुरे बांधण्यात येत होती. रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच आगीचा भडका उडाला आणि गोठा होत्याचा नव्हता झाला.
आगीत भाजल्यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला असून, चार गायी जखमी झाल्या. तसेच शेती उपयोगी साहित्य व २० नग पीव्हीसी पाइप, दीड एकरातील ठिबकसंच, चार ट्रॉली कडबा कुट्टी, २१ टीनपत्रे, पंप, तीन ताडपत्री, पाच पोती ढेप, सहा बॅग सुग्रास, चार बॅग मका भरडा जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतीसाहित्य व पशुधनाचे मोठे नुकसान झाले. ग्राम महसूल अधिकारी एन.एस. देवकर यांनी १० मे रोजी पंचासमक्ष घटनेचा पंचनाम करीत केला. नुकसानीचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्यात आला आहे. यावेळी विशाल साबे, अमोल खर्चे, ऋषीकेश साबे, भागवत यांच्यासह उपस्थित होते. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने तसेच बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. शासनाने तातडीने आपद्ग्रस्त शेतकरी साबे यांनी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.


