Two killed after two-wheeler falls into drain : बुलढाणा ते खामगाव मार्गावरील बोथा घाटातील अस्वलाच्या खोऱ्यात दुचाकी खोल नाल्यात कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

खामगाव : बुलढाणा ते खामगाव मार्गावरील बोथा घाटातील अस्वलाच्या खोऱ्यात दुचाकी खोल नाल्यात कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यातील एक मृतक अमरावती जिल्ह्यातील व दुसरा खामगाव तालुक्यातील रहिवासी आहे.
मुन्ना दादू जामुनकर (वय ४५, रा. बुटीदा, पो. चुरणी, ता. चिखलदरा, जि. अमरावती) तसेच जयराम उर्फ सचिन सुरेश कांडेलकर (वय ३०, रा. बोथा कोळी, ता. खामगाव, जि. बुलढाणा) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना ५ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजेपासून ८ मे २०६ रोजी रात्री ११.१० वाजेच्या दरम्यान घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, एमएच – २७ – बीपी – ५६२० या क्रमांकाच्या दुचाकीने दोघेजण जात होते. चालक मुन्ना जामुनकर हे भरधाव वेगाने व निष्काळजीपणे दुचाकी चालवत होते. बुलढाणा ते खामगाव रोडवरील बोथा घाटातील अस्वलाच्या खोऱ्याजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूच्या खोल नाल्यात कोसळली. या भीषण अपघातात मुन्ना जामुनकर व मागे बसलेले जयराम कांडेलकर यांचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद ९ मे रोजी सायंकाळी ४.१७ वाजता करण्यात आली.
दिलीप मुन्ना जामुनकर (वय २८, रा. गुटीदा, पो. चुरणी, ता. चिखलदरा, जि. अमरावती) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


