The groom had to perform the last rites of his father on the day of the wedding : मुलाचे लग्न अवघ्या काही तासांवर आले असतानाच वर पित्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मंगलमय वातावरण दुःखात बदलले आणि नवरदेवाला आपल्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली.

पित्याचा अपघाती मृत्यू : वधू – वर कुटुंबीयांवर शोककळा : नांदुरा तालुक्यातील कोलासर येथील हृदयद्रावक घटना
नांदुरा : मुलाचे लग्न अवघ्या काही तासांवर आले असतानाच वर पित्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मंगलमय वातावरण दुःखात बदलले आणि नवरदेवाला आपल्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली. अशा शोकाकुल वातावरणातच मुलाचे लग्न लावण्यात आले, तर मुलीचे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. नांदुरा तालुक्यातील कोलासर येथे ९ मे रोजी पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पंढरी त्र्यंबक बगाडे (वय ५३) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. नांदुरा तालुक्यातील कोलासर येथील रहिवासी असलेले पंढरी यांचा मुलगा गोपाल याचा विवाह मलकापूर येथे ९ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता आयोजित करण्यात आला होता. तर मुलीचा विवाह १० मे रोजी कोलासर येथे लागणार होता. दोन्ही विवाह सोहळ्याची तयारी झाली होती. मात्र, शनिवारची पहाट वधू आणि वराकडील मंडळीवर आघात करणारी ठरली.
मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा तालुक्यातील कोलासर फाट्यावर ९ मे रोजी पहाटे ०५.४५ वाजेपूर्वी एमएच – २८ – बीयू – ७६०५ क्रमांकाच्या होंडा युनिकॉर्न या दुचाकीने धडक दिल्याने पंढरी बागडे यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीवरील दोघेदेखील जखमी झाले. अपघातात वडिलांचा मृत्यू झाल्याने नवरदेव असलेल्या मुलासह बगाडे कुटुंबीयांवर शोककळा पसरली. सर्वांनी एकच आक्रोश केला. मुलाचे लग्न काही तासांवर आले असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे नातेवाईक, पाहुणे आणि गावकरी असे सर्वजण हळहळले. मुलगा आणि मुलीचे लग्न ठरल्याने पंढरी बगाडे आनंदी होते. त्यांनी वर आणि वधू पिता या नात्याने सर्व कर्तव्य पार पाडली होती. परंतु मुलाच्या डोक्यावर अक्षता टाकून त्याला आशीर्वाद देण्याचे आणि मुलीचे कन्यादान करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.
या घटनेने कोलासर येथील बगाडे आणि मलकापूर येथील तायडे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीत दोन लग्न लागणार होते. यातील मुलाचे लग्न शोकाकुल वातावरणात साध्या पद्धतीने लावून घेण्यात आले. तर मुलीचा विवाह तुर्त पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


