mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

लोककल्याणकारी प्रशासनातूनच विकासाला गती : Momentum for development through people-oriented administration

शेअर करा :

Momentum for development through people-oriented administration : लोककल्याणकारी प्रशासनातूनच विकासाला गती: राज्यमंत्री योगेश कदम

Momentum for development through people-oriented administration


बुलढाणा, दि. 8: केवळ भव्य इमारती उभारणे म्हणजे विकास नव्हे, तर त्या इमारतींमधून चालणारा कारभार किती लोकहिताचा, पारदर्शक आणि जनतेसाठी उपयुक्त आहे, यावरच खऱ्या विकासाची गती अवलंबून असते, असे प्रतिपादन राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी केले. मेहकर तालुक्यातील सुमारे ४१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

मेहकर येथे अद्ययावत अभ्यासिका, तलाठी व महसूल कार्यालय तसेच पंचायत समिती इमारतींचे उद्घाटन व लोकार्पण राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार किरण सरनाईक, आमदार सिद्धार्थ खरात, मेहकर नगरपालिकेचे अध्यक्ष किशोर गारोळे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकहिताचा कारभार हेच विकासाचे गमक

राज्यमंत्री कदम यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, शासनाच्या योजना आणि सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्यासच विकासाचा खरा अर्थ साध्य होतो. नूतन इमारतींमुळे नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही चांगल्या सुविधा मिळतील. मात्र, केवळ इमारती उभारून थांबणे पुरेसे नाही. अधिकाऱ्यांनी कार्यालयापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना आणि लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्षम आणि संवेदनशील प्रशासनाची गरज

शासन आणि प्रशासन हे नागरिकांपर्यंत विकास पोहोचविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे सर्व विभागांनी कार्यक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. ग्रामविकास विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्रे आणि जिल्हास्तरावर ‘उमेद मॉल’ सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली.

लाभार्थ्यांचे समाधान हीच खरी पावती

अनेक लोककल्याणकारी योजना शासनाकडे आहेत. परंतु, केवळ निधी खर्च झाला किंवा लाभांचे वितरण झाले, एवढेच महत्त्वाचे नसून त्या योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात किती सकारात्मक बदल झाला आणि त्यांना किती समाधान मिळाले, हे अधिक महत्त्वाचे आहे. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हीच प्रशासनाच्या कामाची खरी पावती आहे, असे राज्यमंत्री कदम यांनी अधोरेखित केले. ग्रामीण भागातील शाळा, शासकीय कार्यालये आणि विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन करत त्यांनी नूतन इमारतींमुळे प्रशासन अधिक सक्षम व गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Momentum for development through people-oriented administration


समन्वयाने ग्रामीण विकासाला चालना

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि राज्य शासन या ग्रामीण विकासाच्या प्रमुख संस्था असून त्यांनी लोकाभिमुख पद्धतीने कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे शासकीय सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेशी संवाद वाढवून योजनांची माहिती व लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महसूल, कृषी आणि इतर विभागांनी समन्वयाने काम करून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना द्यावी. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दौऱ्यादरम्यान राज्यमंत्री योगेश कदम यांनी मेहकर पोलीस ठाण्याच्या नव्या प्रशासकीय इमारतीची पाहणी करून कामाचा दर्जा कायम राखत बांधकाम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top