Fetal gender diagnosis at Mane Hospital : शहरातील माने हॉस्पिटलमध्ये केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदानाचा पीसीपीएनडीटी पथकाने पर्दाफाश केला. मालेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या या पथकाने धाड घातली महिलेची सोनोग्राफी करून गर्भलिंग निदान करताना डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले.

मालेगाव : शहरातील माने हॉस्पिटलमध्ये केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदानाचा पीसीपीएनडीटी पथकाने पर्दाफाश केला. मालेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या या पथकाने धाड घातली महिलेची सोनोग्राफी करून गर्भलिंग निदान करताना डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विवेक माने तसेच एका महिला डॉक्टरसह पाच जणांविरुद्ध आज विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मालेगाव शहरासह वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास देविदास वाहुळे यांनी याबाबत मालेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्राप्त तक्रारीनुसार, डॉ. वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. श्रीकांत जाधव, अॅड. राधा नरवालिया, अॅड. शुभांगी ठाकरे, डॉ. चिमणकर धनंजय, पांडुरंग भोंडणे आणि प्रदीप घुले यांच्या पथकाने पथकाने २३ मे रोजी सकाळी मालेगाव येथे सापळा रचला.
मध्यस्थ दीपक बदर (रा. आरेगाव, ता. मेहकर, जि. बुलढाणा) याच्या माध्यमातून एक गर्भवती महिला व तिच्या नातेवाईकाला माने हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. सकाळी सुमारे ११.३० वाजता ते रुग्णालयात पोहोचल्यानंतर मध्यस्थ दीपक बदर आणि रुग्णालयातील कर्मचारी कृष्णा खडसे यांनी पैशांची मागणी केली. त्यानुसार बनावट रुग्णाच्या नातेवाईकाने त्यांना २,३०० रुपये दिले. तसे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कर्मचारी गजानन वानखडे यांनी संबंधित महिलेला तपासणीसाठी डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेले. तेथे एका महिला डॉक्टरने तिची सोनोग्राफी केल्याचे सांगण्यात आले. तपासणीनंतर संबंधित महिलेला पुन्हा एक महिन्यानंतर येण्यास सांगण्यात आले.
बनावट रुग्णाकडून मिळालेल्या संदेशानंतर आरोग्य विभागाचे पथक दुपारी सुमारे १२.१५ वाजता माने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तपासणीदरम्यान सोनोग्राफी कक्षात संबंधित महिला डॉक्टर आढळून आली नाही. तसेच कर्मचारी कृष्णा खडसे व गजानन वानखडे यांच्याकडे घेतलेली रक्कमही सापडली नाही. दरम्यान, मध्यस्थ दीपक बदर हा रुग्णालयातून पसार झाल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी माने हॉस्पिटलचे संचालक डॉ. विवेक माने, कर्मचारी कृष्णा खडसे, गजानन वानखडे, गर्भलिंग निदान करणारी अज्ञात महिला डॉक्टर आणि मध्यस्थ दीपक बदर यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ०३६५/२०२६ अन्वये पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याच्या कलम ४, ५(१)(अ), ६(अ) व २३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे करीत आहेत.
आणखी बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा👉https://mahadesha.com/
डॉक्टरचे डोणगाव कनेक्शन ?
गर्भलिंग चाचणीसाठी मध्यस्थी करणारा दीपक बदर हा रुग्णालयांमधून पसार झाला. दीपक पकडला गेला तर डोणगावमधील डॉक्टरांचे त्याच्यासोबत असलेले संबंध सुद्धा उघड होऊ शकतात. दीपक बदर याच्या मोबाईलचा डाटा व त्याचे डॉक्टर सोबतचे संपर्क तपासल्या गेले पाहिजेत. त्यामुळे डोणगावातच नव्हे तर मेहकर तालुक्यातील मोठे मासे गळाला लागू शकतात. दीपक बदर हा डोणगावपासून जवळ असलेल्या आरेगावचा रहिवासी असून गेल्या कित्येक वर्षापासून तो डोणगाव येथील हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर म्हणून काम करतो. त्याचे डोणगाव व मेहकर येथील डॉक्टरांची चांगले संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य विभागाने लक्ष घालून दीपक बदर याची चौकशी करून मेहकर तालुक्यातील डॉक्टर सोबत असलेले त्याचे कनेक्शन उघड होऊन आतापर्यंत किती गर्भलिंग निदान करून अवैध गर्भपाताची प्रकरणे समोर येतील, अशी चर्चा मालेगाव व मेहकर तालुक्यात होत आहे.


