Khadpurna Project Brings Lifeline to Buldhana City : बुलढाणा शहराला खडपूर्णा प्रकल्पातून जीवनदान: आमदार गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश

बुलढाणा, दि. ७ : बुलढाणा शहराला भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर मात करत, अखेर खडपूर्णा प्रकल्पाचे पाणी शहरात दाखल झाले आहे. आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि प्रशासनाच्या युद्धपातळीवरील कामामुळे हे शक्य झाले आहे. येळगाव धरणातील जलसाठा मृत साठ्याच्या पातळीवर पोहोचल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा गाळयुक्त झाला होता, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
गेल्या महिनाभरापासून बुलढाणा नगरपालिकेमार्फत खडपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. आमदार संजुभाऊ गायकवाड आणि नगराध्यक्षा पूजाताई संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. आज सकाळी खडपूर्णा प्रकल्पाचे पाणी येळगाव जलाशयावर पोहोचल्यानंतर, आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी स्वतः जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन कामांचा आढावा घेतला.
या प्रकल्पातून पाणी उचलण्यासाठी बसवण्यात आलेल्या ६५० एचपी क्षमतेच्या तीन मोटारपंपांना सुरुवातीला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. हायटेन्शन पॅनलमधील विद्युत तारा उंदरांनी कुरतडल्यामुळे पाणीपुरवठा सुरू होण्यास अडथळे निर्माण झाले होते. ही बाब लक्षात येताच, आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी तत्काळ गुजरातच्या वडोदरा येथील संबंधित कंपनीशी संपर्क साधला आणि महाराष्ट्रातील पुणे येथील हितेश कंपनीच्या तांत्रिक पथकाला खडपूर्णा येथे बोलावून घेतले. अकोला येथील महावीर इलेक्ट्रिकल्स आणि चिखली येथील ढवळे इलेक्ट्रिकल्स यांच्या सहकार्याने हायटेन्शन पॅनलची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली. यानंतर खडपूर्णा प्रकल्पावरील पंपिंग यंत्रणा कार्यान्वित झाली.
दरम्यान, खडपूर्णा ते चिखली आणि चिखली ते बुलढाणा या सुमारे ६० किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन मार्गावरील विविध ठिकाणी झालेल्या गळतीची दुरुस्ती नगरपालिकेच्या पथकासह जळगाव जामोद येथील तंत्रज्ञांच्या मदतीने करण्यात आली. सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर, अखेर आज सकाळपासून बुलढाणा शहरासाठी खडपूर्णा प्रकल्पावरून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
यावेळी आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केले. “खडपूर्णा प्रकल्पाचे पाणी सुमारे ६० किलोमीटर अंतरावरून बुलढाण्यात पोहोचत आहे. त्यामुळे या दरम्यान काही तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे.”
या महत्त्वपूर्ण प्रसंगी बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, पाणीपुरवठा सभापती नयनप्रकाश शर्मा, नगरसेवक युनुस खान, प्रशांत जाधव, बबलू मावतवाल, योगेश परसे, निसार खान, रामेश्वर वावरे, अतुल लाहोटी, पाणीपुरवठा अभियंता राजेश गायकवाड यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुलढाणा शहराच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या या संयुक्त प्रयत्नांमुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


