राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२व्या जयंती उत्सवानिमित्त सम्यक समन्वय समितीच्या जंगी मिरवणूक काढली. प्रारंभी शाहू महाराजांच्या बुलढाणा येथील पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगाव येथील परिषदेमध्ये घोषणा केली होती की एक वेळ माझा जन्मदिवस साजरा करू नका, पण राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सणाप्रमाणे साजरी करा. सामाजिक, शैक्षणिक, शेती, अशा विविध क्षेत्रात अद्वितीय असे कार्य केलेले महान बहुजनवादी, लोकशाहीवादी आरक्षणाचे जनक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सम्यक समन्वय समितीने मिरवणुकीचे आयोजन केले. बुलढाणा शहरातील समस्त समविचारी संघटना, संस्था आणि बहुजनवादी, आंबेडकरवादी विचारधारेतील प्रतिष्ठित मंडळींनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला.
जयस्तंभ चौकातील महामानवांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीसा प्रारंभ झाला. यावेळी जयस्तंभ चौकातील राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पुतळ्यांना पुष्प अर्पण करून यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
ढोल ताशा पथक, लेझीम पथक, त्या पाठोपाठ यश सिद्धी सैनिक सेवा संघाचे जवान, छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा असलेला सुशोभित रथ, महिला आणि पुरुष मिरवणुकीत सहभागी झाले होते.
बहुजनवादी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय असा जयघोष करण्यात आला. एसबीआय चौकमार्गे मिरवणूक आयडीबीआय चौक छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा येथे पोहोचली. यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला सैनिकांनी मानवंदना दिली. तसेच उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. राष्ट्रगीताने मिरवणुकीचा समारोप झाला.
अत्यंत शिस्तबद्ध आणि हर्षोल्हासात निघालेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम होतात. मात्र, जल्लोषात मिरवणूक निघत नव्हती. बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन सम्यक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.



