Speeding Sand Tipper Collides Violently with Two-Wheeler : भरधाव रेती टिप्परची दुचाकीला भीषण धडक : शेतकरी जागीच ठार

आसिफ शाह :
मेहकर, : अवैध व भरधाव रेतीवाहतुकीमुळे आणखी एका निष्पाप जीवाला आपला प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी अंजनीखुर्द परिसरात घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीवाहतूक टिप्परने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार शेतकरी गजानन हरिभाऊ मुळे (वय ४४, रा. उदनापूर, ता. लोणार) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन मुळे हे दुचाकी क्रमांक एमएच २८ सीए ६८३० ने सुलतानपूरहून आपल्या गावी परतत होते. अंजनीखुर्द येथील मैत्री हॉटेलसमोर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या रेतीवाहतूक टिप्पर क्रमांक एमएच २८ बीबी ८३०२ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. टिप्पर चालक योगेश रामराव देशमुख (वय २९, रा. आध्रुड, ता. मेहकर) हा वाहन भरधाव वेगात चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
धडक इतकी भीषण होती की गजानन मुळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून संतप्त नागरिकांनी आरोपी वाहन चालकावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत काही काळ रास्ता रोकोचा इशाराही दिला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे, पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार हे पोलिस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, लोणारचे तहसीलदार भूषण पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
मृत गजानन मुळे हे अल्पभूधारक शेतकरी असून आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे उदनापूर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रेतीवाहतुकीवर नियंत्रणाची मागणी
या मार्गावर सध्या वैध व अवैध रेतीवाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः पहाटेच्या सुमारास विना क्रमांकाच्या टिप्परची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक वाहनांवर सुरक्षा आवरण नसल्याने रेती उडून दुचाकीस्वारांच्या डोळ्यांत जात असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. प्रशासनाने अशा वाहनांवर तातडीने कारवाई करून वेगावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


