mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

उष्णलहरींपासून पशुधनाची काळजी घ्या : Take care of livestock from heat waves

शेअर करा :

Take care of livestock from heat waves : वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी जिल्हा स्तरावरील सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, पशुपालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

Take care of livestock from heat waves
संग्रहित छायाचित्र

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन; १९६२ टोल फ्री क्रमांकावर मिळणार तातडीची सेवा

 

बुलढाणा : राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता आणि ‘एल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या उष्णलहरींचा धोका लक्षात घेता, पशुसंवर्धन विभागाने पशुपालक व कुक्कुटपालकांसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी जिल्हा स्तरावरील सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, पशुपालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

उष्णलहरींच्या काळात पशुधनाला पुरेसे स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जनावरांच्या आहारात क्षार मिश्रणे, जीवनसत्त्वे आणि संतुलित आहाराचा समावेश असावा. विशेषतः शेती किंवा ओझे वाहणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते सायंकाळी ४ या तीव्र उन्हाच्या काळात पूर्ण विश्रांती द्यावी आणि त्यांना सावलीत किंवा खेळती हवा असलेल्या थंड जागी बांधावे. गोठ्याचे छत उष्णता रोधक असावे किंवा त्यावर गवत टाकून पाणी मारावे. शक्य असल्यास स्प्रिंकलरचा वापर करून जनावरांच्या अंगावर पाण्याचा फवारा करावा.

पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे, जसे की धापा टाकणे, तोंडातून लाळ गळणे किंवा अस्वस्थता दिसून आल्यास त्यांना तातडीने थंड ठिकाणी हलवून शरीरावर थंड पाण्याचा मारा करावा. अशा परिस्थितीत तातडीच्या उपचारांसाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी किंवा ‘१९६२’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. पशुसंवर्धन विभागाने सर्व दवाखान्यांमध्ये आवश्यक जीवरक्षक औषधांचा साठा उपलब्ध ठेवला असून फिरती पशुवैद्यकीय पथके देखील तैनात केली आहेत.

उघड्यावर बांधू नका

पशुपालकांनी उन्हाच्या वेळी पशुधनाची वाहतूक करू नये किंवा त्यांना उघड्यावर बांधू नये. तसेच सायंकाळच्या दूध दोहनाची वेळ किमान एक तास उशिरा ठेवावी, जेणेकरून उष्णतेचा ताण कमी होऊन दूध उत्पादन टिकून राहील. मृत पशुधनाची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने आणि सार्वजनिक पाणवठ्यांपासून दूर सुरक्षित जागी लावण्याचे निर्देशही स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top