The farmer tied himself to the barn for tillage : बैलजोडी नसल्याने सहा एकर शेती ही ट्रॅक्टरयंत्राच्या भरवशावर सुरू होती. मात्र, तुटवडा पाहता इंधन मिळत नसल्याने ट्रॅक्टरवालेही शेती मशागतीच्या कामाला येऊ शकत नसल्याने वैतागलेल्या एका युवा शेतकऱ्याने स्वत:ला वखराला जुंपून वखरणी केली.


बैल नाहीत, इंधनाअभावी ट्रॅक्टरवालेही येत नसल्याने तारांबळ
बुलढाणा : बैलजोडी नसल्याने सहा एकर शेती ही ट्रॅक्टरयंत्राच्या भरवशावर सुरू होती. मात्र, तुटवडा पाहता इंधन मिळत नसल्याने ट्रॅक्टरवालेही शेती मशागतीच्या कामाला येऊ शकत नसल्याने वैतागलेल्या एका युवा शेतकऱ्याने स्वत:ला वखराला जुंपून वखरणी केली. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे हा धक्कादायक प्रकार घडला.
विशाल मुरुख असे या हतबल युवा शेतकऱ्याचे नाव आहे. आदिवासीबहूल संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील रहिवासी असलेल्या या शेतकऱ्याकडे सहा एकर शेती आहे. बैलांची जागा आता आधुनिक ट्रॅक्टर्सनी घेतली आहे. बहुतांश शेतकरी शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरचाच वापर करीत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, तेथे रांगा लागलेल्या दिसतात. आधीच टंचाई असल्याने शेतीची कामे करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्यांना डिझेल मिळत नाही. परिणामी शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी या लिंकवर करा👉
बावनबीच्या विशाल मुरुख या शेतकऱ्यालाही पेरणीच्या तोंडावर शेतीची मशागत कशी करावी, असा प्रश्न पडला. अशा स्थिती शेतकरी विशालने मशागत करण्यासाठी स्वत:लाच वखराला जुंपून घेत वखरणी सुरू केली. घाटाखालील भागात धूळ पेरणीला प्राधान्य दिले जाते. शेतकरी उन्हाळ्यातच शेती तयार करून कपाशीची लागवड करतात. या शेतकऱ्यालाही कपाशीचे पीक घ्यायचे असल्याने वखरणी करणे गरजेचे होते. ट्रॅक्टरला पर्याय म्हणून बैल नसल्याने शेतकऱ्याने स्वत:च वखराचे जू खांद्यावर घेत वखर ओढायला सुरुवात केली. हे विदारक चित्र पाहून सरकारने आता तरी इंधनाची उपलब्धता करावी, अशी मागणी होत आहे.
जगाचा पोशिंदा बळीराजा संकटात
कृषी प्रधान देश अशी भारत देशाची ओळख आहे. तर अन्नदात्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. मात्र, या देशात याच बळीराजाची दैना होत आहे. धान्याला हमी भाव मिळत नाही. अडचणींचा त्याच्यासमोर मोठा डोंगर नेहमीच उभा असतो. वेळोवेळी ओढवणाऱ्या आपत्तीचा सामना करून तो पुन्हा नव्या दमाने, नव्या आशेने पैसा नसतानाही शेती कसण्यासाठी तयार असतो. अशा कितीतरी संकटांना सामोरे जाण्याची ताकद ठेवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासनाने उभे राहून त्यांना उभारी द्यावी, अशी अपेक्षा कष्ट उपसणाऱ्या शेतकरी वर्गाला आहे.


