The turncoats left, but the staunch Shiv Sainik did not budge from his position. :
उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल: नमकहराम गेले पण कट्टर शिवसैनिक जागेवरून हलला नाही

वाशिम, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडींमध्ये, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशिम येथे आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या अथांग मेळाव्यात बंडखोरांवर आणि भाजपवर जोरदार प्रहार केला. “शिवसेना संपली अशी कोल्हेकुई करणाऱ्यांना आता माझी आणि माझ्या शिल्लक राहिलेल्या शिवसैनिकांची ताकद काय आहे, हे मी महाराष्ट्रभर फिरून दाखवून देणार आहे. हरामखोर गेले, नमकहराम गेले, पण माझा एकही कट्टर शिवसैनिक जागचा हललेला नाही!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विदर्भाचा झंझावाती दौरा आणि बंडखोरांवर निशाणा
वाशिम-यवतमाळचे विद्यमान खासदार संजय देशमुख यांच्यासह शिवसेनेच्या पाच खासदारांनी केलेल्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी विदर्भाचा झंझावाती दौरा सुरू केला आहे. २७ जून रोजी वाशिम येथील अकोला नाका परिसरातील जैन भवन येथे झालेल्या या सभेत त्यांनी बंडखोरांचा खरपूस समाचार घेत शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य फुंकले.

‘नमकहराम’ शब्दाचे समर्थन आणि गद्दारीचा आरोप
उद्धव ठाकरे यांनी ‘नमकहराम’ या शब्दाचे समर्थन करताना म्हटले की, “नमकहराम ही शिवी नाही. उपकारकर्त्याचे उपकार विसरून त्याच्या पाठीत खंजीर खुपसणारा प्रत्येक जण हरामखोरच असतो. मिंध्यांपासून सगळेच नमकहराम आहेत. ही गद्दारी केवळ शिवसेनेशी झालेली नाही, तर ती हिंदुत्वाशी झालेली गद्दारी आहे.”
भाजपच्या हिंदुत्वावर ‘भोंदूपणा’चा आरोप
भाजपच्या विचारसरणीवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आमच्या अंगात अस्सल कडवट हिंदूंचे रक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी भगवा आमच्या हातात आहे. या गद्दारांपैकी एकाची तरी लोकसभेत उठून प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का? राम मंदिराचा मुद्दा आणि आमच्याशी झालेली गद्दारी आम्ही कधीही विसरणार नाही. भाजपचे हिंदुत्व हे केवळ ‘भोंदूपणा’ आहे.”

शिवसैनिकांच्या निष्ठेचे कौतुक आणि भविष्यातील वाटचाल
शिवसेनेच्या सामाजिक कार्याची आठवण करून देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शाखेत मदत मागायला किंवा रक्ताची गरज म्हणून आलेल्या व्यक्तीला शिवसैनिक कधीही त्याचा पक्ष विचारत नाही; मग तो भाजपचा का असेना! पण आता या गद्दारांना निष्ठेची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे.
आपल्या भावना अत्यंत संवेदनशील आणि खंबीरपणे मांडताना उद्धव ठाकरे म्हणाले, “दुर्दैवाने काही नमकहराम बाजूला झाले असले, तरी मी माझ्या जागी ठाम आहे. मी जनतेशी आणि शिवसैनिकांशी वचनबद्ध अन् कटिबद्ध आहे. मी कधीही थकणार नाही आणि खचणारही नाही! संकटाच्या छाताडावर पाय देऊन पुढे जाणारे ‘मर्द शिवसैनिक’ बाळासाहेबांनी माझ्या पाठीशी उभे केले आहेत. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत कितीही संकटे आली, तरी त्यांना पायदळी तुडवून त्यांच्या उरावर भगवा रोवल्याशिवाय मी राहणार नाही.”
डॉ. देवळे यांची अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर
याच सभेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुख डॉ. सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी जाहीर केली. देवळे यांना उद्देशून ते म्हणाले, “गेल्या निवडणुकीत किती मते मिळाली होती? आतापासूनच तुम्ही तयारीला लागा, तीन वर्षे तुमच्या हातात आहेत.” वाशिम (SC) मतदारसंघातून डॉ. देवळे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली होती, मात्र भाजपच्या श्याम खोडे यांच्याकडून त्यांचा निसटता पराभव झाला होता. ठाकरे यांच्या या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
या जाहीर सभेला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अलोट गर्दी केली होती. व्यासपीठावर प्रामुख्याने जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, संपर्क प्रमुख डॉ. सिद्धार्थ देवळे, सुधीर कव्हर, गजानन देशमुख वडजीकर, विश्वनाथ सानप, कॅप्टन प्रशांत सुर्वे यांसह अनेक पदाधिकारी, सभापती आणि नगरसेवक उपस्थित होते.


