Rajgad falls into mourning due to the cruel fate : नियतीच्या क्रूर घाताने राजगडवर शोककळा: सर्पदंशाने चिमुकल्या राजचा अकाली अंत

डोणगाव प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील राजगड गाव आज एका हृदयद्रावक घटनेने सुन्न झाले आहे. नियतीच्या क्रूर घाताने अवघ्या सहा वर्षांच्या राज अभिषेक राठोड या चिमुकल्याचा सर्पदंशाने अकाली अंत झाला आहे. ही घटना इतकी अनपेक्षित आणि वेदनादायी आहे की, संपूर्ण राजगड गावावर शोककळा पसरली आहे. कालच शाळेचा पहिला दिवस अनुभवलेल्या राजसाठी तोच दिवस जीवनातील शेवटचा ठरला, ही कल्पनाच मन हेलावून टाकणारी आहे.
३ जुलैच्या रात्री घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. राजगड येथील अभिषेक राठोड यांचा सहा वर्षांचा मुलगा राज याला रात्रीच्या वेळी सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच, त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्याची धावपळ सुरू झाली. मात्र, काळाने त्याच्यावर असा काही घाला घातला की, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. ही बातमी गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
अभिषेक राठोड यांनी २ जुलै रोजीच आपल्या लाडक्या राजचे डोणगाव येथील जीवन विकास कॉन्व्हेंटमध्ये पहिलीत प्रवेश घेतला होता. शाळेचा पहिला दिवस राजसाठी खूप आनंददायी ठरला. शाळेतील गमतीजमती, नवीन मित्र आणि शिक्षकांसोबतचा अनुभव त्याने घरी येऊन आई आणि लहान बहीण अक्षरासोबत उत्साहाने शेअर केला. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या गप्पा मारता मारता राज आईजवळच झोपी गेला.
रात्री साधारणतः बारा वाजण्याच्या सुमारास वीज गेली. उकाड्यामुळे अभिषेक राठोड यांनी घरात हवा यावी म्हणून घराचा दरवाजा उघडा ठेवला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास राज झोपेतून उठला आणि रडू लागला. त्याच्या पायाला काहीतरी चावल्याचे पाहून आई-वडिलांना वाटले की उंदीर किंवा तत्सम काहीतरी चावले असेल. त्यांनी त्याला जवळ घेऊन शांत केले. मात्र, दोन ते अडीच वाजताच्या सुमारास राजला असह्य वेदना होऊ लागल्या आणि त्याचा पाय निळा पडू लागला. ही गंभीर स्थिती पाहून त्याच्या आई-वडिलांनी त्याला तातडीने उपचारासाठी डोणगावच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. परंतु, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच राजने रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला.
दोन जुलै रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहाने गेलेला राज, सकाळी लवकर उठून शाळेत जायचे आहे म्हणून झोपी गेला होता. पण काळाने त्याच्यावर अशी झडप घातली की, त्याचे ते स्वप्न अपुरेच राहिले. त्याच्या निरागस चेहऱ्यावरील हास्य कायमचे मिटले.
राजला सर्पदंश केल्यानंतर तो साप घरातील पलंगाजवळ असलेल्या एका खोक्यात जाऊन लपला होता. गावकऱ्यांनी पाहणी केली असता, तो साप त्याच ठिकाणी आढळून आला. या घटनेने राजगड गावातील प्रत्येक घरात शोककळा पसरली आहे. एका चिमुकल्याच्या अकाली निधनाने गावातील वातावरण शोकमग्न झाले आहे. या दुर्दैवी घटनेने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या वेदना शब्दातीत आहेत.


